Wednesday, 13 July 2011

सांजवेळी

सांजवेळी वेलीवर पाखरू भिजू लागलं
अंगणी पावसाचं पाउल वाजू लागलं

वहिमध्ये कवितेचा उत्सव साजरा झाला
शब्दामध्ये सुरांचं गाणं भिजू लागलं

तुझ्या डोळ्यात दाटलेलं काळभोर आभाळ
सुन्या माझ्या उंबरठी तुफान होऊ लागलं

आत्म्यातून जेव्हा घुमू लागली बासरी
अस्तित्व अवघं जणू राधा होऊ लागलं

तू येणार की नाही विचारायचं कसं
तरी पायवाटेवर मन झुरु लागलं

अशीच होती कातरवेळ असाच होता पाउस
तुझं नाव आठवणीत मनात लाजू लागलं

माझी हासरी बाहुली

कशी छान निजलेली
माझी इवली छकुलि
गाली खट्याळ खळि
माझी हासरी बाहुली

हात नाजुकसे घेशी
तुझ्या कवेत मिटून
स्वप्न डोळ्यात गोजिरे
जाई रंगून रंगून

दीसभर घाली दंगा
तुझे नाचरे पाउल
किती चिमणासा जीव
घाली घराला ग भूल

स्वप्नि हसते उगाच
आली ओठांत जांभई
बोट मुठीत धरून
केली गोड गाई गाई

पापणीत रोज येते
नीज घेउनिया आई
दूर बाळा मी तरीही
स्वप्नि गाईन अंगाई

देवा तुला नाही दया
कसा निष्ठुर तू झाला
माझ्या सोनुलिमध्ये
अजुन जीव गुंतला

नीज नीज लडिवाळा
घेते सुखाने निरोप
उरी साठवुन घेते
तुझी साखरेची झोप

जरासे

लहरत आले अवखळ पान
आठवले मग क्षण जरासे
थेंब पावसाचे असे झिरपले
अन फसले भास जरासे

वेलीवरची जुई कोवळी
बहरावी ऋतूत खुलुन
हळूच झुकता तळ्याकाठाशी
थरथरले थेंब जरासे

उगाच शब्दांचा मांडावा खेळ
भावनांची उमटावी घुसमट
गीत स्वरांचे कानी पड़ता
उमजावे त्यातील आघात जरासे

फान्दिवरचा चिमणा रावा
आळवणी त्याची सांज- सकाळ
क्षुब्ध मनाचा आर्त आकांत
ऐकुनी थांबले पक्षी जरासे

गर्द सावली आठवणीची
दाटुनी यावी मन्मनाला
ओठांच्या हसरया कडयातुन
साकारा येई दुःख जरासे

स्पर्श तुझ्या आठवणीचा

 स्पर्श तुझ्या आठवणीचा
मनी वेड लावुनी गेला
पापणीचा उंबरा ओलांडून….
एक अश्रु आज ओघळला..!!

छेडिलेल्या अंतरीच्या तारा
सप्तसुर तो आळवलेला
सुनसान करुनी मैफल….
आज दूरदेशी निघाला..!!

हृदयात आज उमटल्या
पुसलेल्या खुणा पावलांच्या
निःशब्द जणू मनाला….
नकळत चाळवून गेला..!!

चांदणे तुझ्या हास्याचे
स्मरवितो आज मला
विरहाचीच अवघ्या जणू….
कथा ऐकवुनी गेला..!!

कुणी किती अडवावे आता
थांबता तो थाम्बेना
क्षण एक देवूनी भेटीला….
पापणीत जरा रेंगाळला..!!

तो काय जाणो माझी परवड
होती त्याचीच साथ केवळ
धुडकावून नयनाचे बंधन….
लागे दूरस्थ देशीच्या वाटेला..!!

ओलेत्या पापणीचा एकमेव
तो आठवण थेंबही दुरावला
अन अवसेच्या गर्द अंधारी….
माझा चंद्र आज हरवला..!!!!
माझा चंद्र आज हरवला..!!!!

पापणीचा उंबरा ओलांडून
एक अश्रु आज ओघळला….
एक अश्रु आज ओघळला….!!!!